माथेरान

माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वांत जवळची आणि निसर्गसौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. साधारण ८०३ मी. किंवा २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे. येथील पठाराची बरीचशी टोके तसेच पूर्व-पश्विम व दक्षिणेकडील कडे कोसळले आहेत. ह्या कडांनाच पॉईंटस् म्हटले जाते. ज्या इंग्रजांनी माथेरान वसवले त्यांनीच या पॉईंटस् ना नावे दिली, त्यामुळे सहाजिकच ती इंग्रजीत आहेत.
माथेरान ही सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जरा सुटावलेली, वेगळी डोंगर रांग आहे. कल्याणच्या हाजीमलंगपासून ही डोंगर रांग सुरू होते. हाजीमलंगला लागून बदलापूरच्या ‘टवली’ गुहांचे किंवा बदलापूरचे डोंगर आहेत. नंतर ‘नवरानवरी’चा डोंगर लागतो. ह्यावर असणाऱ्या बारीकसारीक सुळक्यांमुळे हा डोंगर लगेच ओळखता येतो. त्यापुढे चंदेरीचा प्रचंड उभा सुळका आणि नंतर ‘म्हैसमाळ’ नावाचा डोंगर लागतो. नंतर आरपार भोक असणारा ‘नाखिंद’ डोंगर लागतो आणि मग ‘पेब’ दिसतो. त्याच्यावरही किल्ल्याचे काही अवशेष आहेत. यानंतर मग माथेरानचा डोंगर सुरू होतो.
माथेरानच्या जंगलात १५० प्रकारचे वृक्ष आढळतात. विविध जातीच्या, तसेच औषधी वनस्पतीही इथे आहेत. हे जंगल सदाहरित व निमसदाहरित या प्रकारात मोडते. त्यामुळे जास्त पर्जन्यमानाला अनुकूल असणारी जांभूळ, हिरडा, बेहडा, खैर, पांढरीची झाडे दिसतात. ह्या जंगलाचा फायदा म्हणजे कुठल्याही पॉईंटवर जाताना सावली मिळते व उन्हाचा कधीही त्रास होत नाही.